Samadhi Mandir

श्री प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने कणकण पवित्र झालेली नाशिक ही पुण्यभूमी. जीचा पुराणात अनादी काळापासून उल्लेख आहे. दर १२ वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा ही सर्वात मोठी धार्मिक पर्वणी भक्तांना असते. या नाशिक नगरीत संत परंपरा ही खुप मोठी व पुरातन आहे. नाशिक शहर पंचक्रोशीत पाच संतांची समाधी मंदिरे आहेत. त्यात श्री स्वामी नारायण, श्री अजगरेश्वर महाराज, श्री चंद्रमौलेश्वर महाराज, श्री अद्वैतेश्वर, श्री नरसिंग गोपालदास महाराज.

श्री गजानन महाराजांप्रमाणे श्री गोपालदास महंत कोठे जन्मले, कोठून आले ह्या विषयी काहीच माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या बद्दल ही काही माहिती कोठेच सापडत नाही. नाशिक येथे गोदावरीच्या काठावरील भाटे ह्यांच्या धर्मशाळेच्या मागे अळवाची मोठी खाच होती. त्या खाचेतील चिखलात गोपालदास रात्रंदिवस पडलेले असत. त्या वेळेस लोकांना हे श्रेष्ठ योगी आहेत ही कल्पना नव्हती. तरी पण लोक त्यांना चिखलातून बाहेर काढीत असत. परंतु ते परत चिखलात जाऊन पडत रहात. असा प्रकार खूप दिवस चालला होता.

ते काही खात पीत नसत व त्यांचा कोणत्याही प्रकारे कोणास त्रास नसे. त्यांना देहभान नव्हते व चिखलात पडलेले असतं. कधी त्यांच्या अंगाभोवती सर्प वेटोळे घालून बसलेले असत. ह्यामुळे लोक घाबरून त्यांच्या जवळ जात नसत. असे ३ वर्षे ते चिखलात पडून होते. त्यांचे श्रेष्ठत्व व हे सामान्य माणसांचे काम नाही हे लोकांना कळायला लागले होते. शेवटी नांदगावकर, दत्तोपंत चाफेकर व इतर काही लोकांनी त्यांना तेथून काढून काळाराम मंदिरात आणायचा निश्चय केला. ठरल्याप्रमाणे सर्वानी त्यांना त्या चिखलातून बाहेर काढले, गोदावरीच्या पाण्यानी त्यांना स्नान घातले व काळाराम मंदिरातील ओवरीत आणले. ते तेथे जे उभे राहिले ते तब्बल दीड वर्षे तसेच उभे राहिले. भक्तजन त्यांना नैवेद्य आणून देत पण त्याचा काही उपयोग होत नसे. कारण ते काही खात पीत नसत. एवढेच काय पण त्या कडे बघत पण नसत. कोणी तोंडात घास घातल्यास ते तो थुंकून टाकत किंवा थोडासाच खात. दीड वर्षानंतर त्यांनी मंदिराच्या ओवरीतच बैठक मारली व धुनी ठेवली.

ऐकिले भक्तांचे वचन । गोपाळे केले आसन । पेटविले धुनी साधन । निज सन्मुख ।
सदा राहे अफाट वृत्ती । दिगंबर नग्न मूर्ती । परी कोणाही कष्ट । न देती योगेश्वर ।
सर्व तेथेच करती विधी । परी न सुटे दुर्गंधी । जे स्वयेंचि असे सुगन्धी । तेथे घाण केवी येई ।

गोपाळदासांचे इष्ट दैवत नृसिंह होते व ते सतत ह्याच नावाचा मंत्रोच्चार करीत असत. त्यामुळे लोक त्यांना नरसिंह महाराज म्हणीत. ह्या नावानेच ते नाशिक मध्ये ओळखले जातात. त्यांच्या ध्यान देवतेचे अधिष्ठान ते जेथे बसत असत तेथील खांबातच त्यांनी निश्चित केले होते व ते त्या खांबास कोणास स्पर्श पण करून देत नसत. ह्यांना एक सवय होती ती म्हणजे गांजा ओढण्याची पण हे व्यसन नव्हते व ते त्याच्या आधीन नव्हते. ह्याबद्दल ते म्हणत ‘ये तो माप मापना है’ नंतर ते थोडे थोडे बोलू लागले. पण ते बोलणे सर्वांसाठी नसून ठराविक भक्तांसाठी असे. विशेष व्यक्तींशी ते रात्री बाराचे पुढे वेदांत धर्म इत्यादी विषयांवर चर्चा करत तेंव्हा त्यांचे ज्ञानाची लोकांस कल्पना येई. श्री माधवनाथ महाराज, श्री रामानंद बीडकर महाराज व साई चरित्र इत्यादी संतांच्या चरित्रात गोपाळदासांचा उल्लेख आहे. तसेच गजानन विजय ग्रंथात पण ह्यांचा उल्लेख आहे.

श्री दासगणु सारखे ग्रंथ चरित्रकार श्री गजानन विजय, श्री साईसच्चरित्र, नाथ संजिवनी ग्रंथांत श्री गोपालदास उर्फ नरसिंग महाराज चैतन्यमय विभुतीचं महत्व व साक्षात परमेश्वर असल्याची नोंद केली आहे. यावरून नरसिंग महाराजांच्या दिव्यत्वतेची प्रचिती येते.

श्री साईबाबांच्या पोथीतील गोपालदास महाराजांचा उल्लेख (अध्याय ३३ वा).

एक भक्त भावीकनामे हरीभाऊ कर्णिक । डहाणू ग्रामीचं स्थायिक अनन्य पाईक साईंचे ॥१९८॥ सन एकोणीसशे सतरा । पाहोणी गुरूपौर्णिमा पवित्र । करू आले शिर्डीची यात्रा । त्या अल्पचरित्रा सांगतो ॥१९९॥ यथाविधी पूजा झाली । दक्षीनावस्त्रे अर्पण केली । आज्ञा घेऊनी उतरता खाली कल्पना आली मनास ॥२००॥ वाटले आणिक एक रूपया । वरती जाऊन बाबास द्यावा । तोच तो विचार लागला त्यागावा । रूपया ठेवावा तैसाच ॥२०१॥ ज्या गृहस्थे अज्ञा देवविली । त्यानेच वरून खूण केली । आता एकदा आज्ञा झाली । पुढील पावली मार्गक्रमा ॥२०२॥ विश्वास ठेऊनीया संकेती । कर्णिक तैसेच पुढे निघती । उतरते झाले नाशिक वरती । मित्र समवेती मार्गात ॥२०३॥ काळ्यारामाचे देऊळात । कर्णिक जाता दर्शनार्थ । नरसिंग महाराज संत दर्शन अवचीत जाहले ॥२०४॥ भक्त परिवार असती भोवती । महाराज अकस्मात उठती । कर्णीकास मणिबंधी धरीती । रूपया म्हणती दे माजा ॥२०५॥ कर्णीक मनी जाहले विस्मीत । रूपया मोठ्या आनंदे देत । कैसा साईही मनोदत्त । रूपया स्विकारीत वाटरले ॥२०६॥ श्री गजानन विजय ह्या पोथीतील उल्लेख अध्याय ११ वा मग ती मंडळी निघाली । शेगावहून भली । शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वरा कारणे ॥८२॥ कुशावर्ती केले स्नान । घेतले हराचे दर्शन । गंगाद्वारा जाऊन । पूजन केले गौतमीचे ॥८३॥ वंदीली माय निलंबीका । तेवी गहणीनाथ देखा । तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥८४॥ हा गोपाळदास महंत । काळ्यारामाच्या मंदिरात । धुनी रावून द्वारात । पंचवटीच्या बसलासे ॥८५॥ राम मंदिरासमोर । एक पिंपळाचा होता पार । शिष्यासहित साधुवर । तेथे जाऊन बैसले ॥८६॥ गोपालदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला । आज माझा बंधु आला । वऱ्हाडातुन गजानन ॥८७॥ जा घ्या त्यांचे दर्शन । अनन्य भावे करून । माझी ही भेट साक्षात । देह भिन्न म्हणुन द्वैत । आम्हा उभयती मानू नका ॥८९॥ शिष्यांनी तैसेच केले । दर्शन घ्याया अवघे आले । कंठा माझी घातीले । दिलेल्या पुष्प हाराला ॥९०॥ नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामी समोर । ती पाहुन गुरूवर । ऐसे बोलले भास्कराला ॥९१॥ हा प्रसाद अवघ्यास वाटी । परी न होऊ देई दाटी । माझ्या बंधुची झाली भेटी आज या पंचवटीत ॥९२॥ माझे येथील काम झाले । आता नाशकाचे राहिले । म्हणून पाहिजे तेथे गेले । धुमाळ वकिलाच्या घरा ॥९३॥ महाराज आले नाशकात । लोक दर्शनास जमले बहुत । बारिक सारीक गोष्टी अमित । तेथे असता जाहल्या ॥९४॥ त्या अवघ्या सांगता । विस्तार होईल उगीच ग्रंथा । म्हणुन देतो संक्षेप आता । त्याची क्षमा कराहो ।

श्री गजानन महाराज गुप्ते यांचे पट्टशिष्य श्री दादा महाराज चिटणीस यांच्या वडिलांची मुले जगत नसत म्हणुन ६ महिन्यांच्या दादांना त्यांनी महाराजांच्या पायावर ठेवले. महाराजांनी बालकास जवळ घेतले आणि म्हणाले, "सोला सालतक बच्चा तुम्हारा, सोला सालके बाद हमारा" असा आशिर्वाद दिला श्री दादा महाराज चिटणीस आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करून समाधीस्थ झाले.

संकलन - स्व. दशरथ (भाऊ) डोंगरे

एक ब्रिटिश अधिकाऱ्याची पत्नी राम मंदिरात आली असता गोपालदास महाराजांना पाहून "या वेड्याला मंदिरा बाहेर काढ़ा" असा आदेश दिला. पुजाऱ्यांनी महाराजांना बाहेर काढून दरवाजे बंद केले पण महाराज पहाटे पुन्हा मंदिरात आढळून आले, असे वारंवार केल्याने ती ब्रिटीश स्त्री महाराजांची भक्त बनली. महाराज जवळपास २७ वर्ष राम मंदिरात पूर्व दरवाजा येथे आपली अखंड धुनी पेटवुन रहात. असा उल्लेख आलेला आहे. ह्या मधल्या काळात त्यांना अनेक मोठे मोठे संत भेटून गेल्याचा उल्लेख त्या त्या संतांच्या चरित्रात दिसुन येतो त्यात काही प्रमुख नावे पुढीलप्रमाणे सांगता येतील. श्री माधवनाथ महाराज उर्फ नाथ महाराज (इंदौर), श्री गजानन महाराज (शेगांव), श्री गोविंद महाराज (सोनगीर धुळे) श्री गजानन महाराज गुप्ते (नाशिक), श्री गोंदवलेकर महाराज (गोंदवले), श्री बिडकर महाराज सारख्या महान विभुतीच नरसिंग महाराजरूपी परमेश्वराला ओळख़ु शकतात. त्यांच्या तेजस्वी चैतन्याची त्यांच्या उर्जास्त्रोताची दखल घेतात.

श्री साई चरित्रात ३३ व्या अध्यायात अशी गोष्ट आहे की कर्णिक नावाचा, डहाणू येथील एक भक्त, गुरुपौर्णिमा सन१९१७ रोजी शिर्डीस गेला श्री साई बाबांचे दर्शन घेऊन तो बाहेर पडला. तेंव्हा त्याचे मनात आले की आणखीन एक रुपया बाबांस अर्पण करावा. तो न करता तो भक्त आपल्या घरी डहाणू येथे जाताना नाशिकला काळाराम मंदिरात गेला व गोपालदास महाराजांचे दर्शन घेताच महाराज म्हणाले माझा राहिलेला रुपया दे. असा रीतीने श्री साई बाबानी तो रुपया घेऊन भक्ताची इच्छा पूर्ण केली. ह्या वरून हे कळते की सर्व संतांचा आपापसात कसा संवाद होता.

वाटले आणिक एक रुपया । वरती जाऊन बाबांशी द्यावा ।
तोच तो विचार लागला त्यागावा । रुपया ठेवावा तैसाच ।
ज्या गृहस्थे आज्ञा देवविली । त्यानेच वरून खूण केली ।
आता एकदा आज्ञा जाहली । पुढील पाऊली मार्गक्रमा ।
विश्वास ठेऊनिया सांकेति । कर्णिक तैसेचि पुढे निघती ।
उतरते झाले नाशिकवरती । मित्रसामवेति मार्गात ।
काळ्यारामाचे देवळात । कर्णिक जाती दर्शनास ।
नरसिंगमहाराज संत । दर्शन अवचित जाहले ।
भक्तपरिवार असता भोवती । महाराज अकस्मात उठती ।
कर्णिकांस मणिबंधी धरिती । रुपया म्हणती दे माझा ।

- साई चरित्र अध्याय ३३

एकदा श्री माधवनाथ महाराज श्री गोपालदास महंतांकडे गेले तेथे गेल्यावर त्यांनी त्यांच्याकडे पाहून आपले दंड थोपटले. ते पाहून गोपाळदासांनी आपल्या मांडीवर थाप मारली .त्यावर माधवनाथांनी तोंडाशी हात घेऊन मोठा ध्वनी केला. तसेच गोपाळदासनी पण केले. अशा खुणा सामान्य माणसांच्या बुद्धीला समजणे शक्यच नाही ते फक्त संतच जाणतात. ह्याचे वर्णन श्री माधवनाथ महाराज चरित्रात असे वर्णन केले आहे.

नाथ येता देखे दुरून । केले परमहंस हास्यवदन ।
हसतचि उभा राहून । मांडीवरी थाप ठोकली ।
नाथे ठोकिले निजदंड । केले एक निनाद ।
गोपालानेही तैसा स्वरभेद । केला निजमुखे ।
झाला हाचि संवाद । हेचि ह्या संतांचे शब्द ।
ह्याचा अर्थ बहू गोड । संतचि जाणती ।

- श्री माधवनाथ चरित्र

साकोरी येथील हंसराज नावाचा एक भक्त दम्याच्या विकारांनी हैराण झाला होता व निपुत्रिक पण होता. तो महाराजांच्या दर्शनास काळाराम मंदिरात गेला तेंव्हा महाराज म्हणाले की तुला बाधा आहे व त्यासाठी तू शिर्डी येथे जा. श्री साई बाबा तुला दोन थोबाडीत मारतील व तुझे काम होईल. त्याप्रमाने हंसराज हे १९१६ मध्ये शिर्डीस गेले. श्री बाबास नमस्कार करताच श्री बाबानी ह्यास दोन थोबाडीत मारल्या व भूतास म्हणाले निघून जा. त्या दिवसापासून हंसराज ह्यांचा दमा कायमचा बरा झाला व त्यास यथावकाश पुत्रलाभ झाला.