श्री देवनाथ महाराज ह्यांच्या दिपप्रकाश ह्या अध्यात्मिक ग्रंथात नाथ पंचायन म्हणून श्री गोपालदास महाराज, श्री साईनाथ महाराज, शेगांवचे श्री गजानन महाराज, इंदौरचे श्री माधवनाथ महाराज व पलुसचे (सांगली) श्री धोंडीराज महाराज असे नाथपंचायतनचा उल्लेख आहे.
१३/२/१९२० म्हणजे माघ वद्य नवमी शके १८४१ (दास नवमी) रोजी पहाटे ब्रम्हमुहूर्तावर काळाराम मंदिर पुर्व दरवाजा येथे ध्यान योगाने समाधी लावून ते ब्रम्हतत्वात विलीन झाले त्यांची संजीवन समाधी त्यांनी दर्शविलेल्या ठिकाणी म्हणजे वरुणा (लक्ष्मण रेषा / वाघाडी) गोदावरी व सरस्वती यांचे त्रिवेणी संगमातील एका मोठ्या खडकावर बांधण्यात आली.
तात्यासाहेब वाणवळे ह्यांना होशंगाबाद येथे त्यांच्या मुलीच्या घरी गोपालदास महाराजांना घेऊन जाण्याची इच्छा झाली. त्यांना नातू झाला होता व मुलीस महाराजांच्या दर्शनाची इच्छा झाली. पण गोपाळदासनी जाण्याचे नाकारले. शेवटी श्री माधवनाथांस मध्यस्थी घातले व दोन माणसे गोपालदास महाराजांना आणावयास गेली. त्यांना पाहून महाराजांनी उग्र रूप धारण केले व म्हणाले ‘नरसिंह अपना आसन छोडकर नही जाते. चले जावं. नही तो दंडा मिलेगा’ तेंव्हा ती दोन माणसे पळून गेली. मग श्री माधवनाथांनी परत मध्यस्ती केली व निरोप पाठवला ‘आपके भाई कहते है नर्मदा माता बुलाती है’ मग आपली फाटकी गोधडी घेऊन व विजार घालून ते टांग्यात बसले.
श्री गोपालदास तसे नग्नच असत पण बाहेर जाताना तसे जात नसत. ते शांत वृत्तीने रेल्वेत बसले व मध्ये जळगाव येथे कर्डीले मामलेदार ह्यांचे कडे उतरले. तेथे जाताच अत्यन्त घाणेरड्या नाल्याचे पाणी पिऊन ते पिशाच्च लीला करू लागले. त्यांना आणण्यास जे लोक गेले त्यांना पण पाण्याचा प्रसाद मिळाला पण ते पाणी नर्मदा जलसारखे गोड लागले. श्री माधवनाथ महाराज व गोपालदास ह्यांच्या भेटीचे बरेच उल्लेख सापडतात परंतु त्यांच्या बोलण्याची सांकेतिक भाषा इतरांस समजत नसे.
श्री बीडकर महाराज हे नाशिक येथे सून १९०८ मध्ये काळाराम मंदिरासमोरील दत्त मंदिरात ६ महिने राहिले होते. हे १०७ वर्ष जुने दत्त मंदिर पंचवटीत काळाराम मंदिराचे समोर आहे व श्री बीडकर महाराजांनीच स्थापन केले आहे. जेंव्हा श्री बीडकर महाराजनचे भक्त गोपाळदासांचे दर्शनास गेले तेंव्हा ते म्हणाले सोने येथून तेथून सर्व सारखेच असते. अशा रीतीने गोपाळदासनी सांगितले की सर्व संत सारखेच असतात त्याची पडताळणी नको. श्री गजानन विजय ११ व्या अध्यायात श्री गजानन महाराज व गोपालदास ह्यांच्या भेटीचा उल्लेख असा वर्णन केला आहे.
गोपालदास महंत हे फार उच्च कोटीतील संत होते. त्यांनी नाशिक येथे शुक्रवार माघ वद्य नवमी शके १८४१ रोजी आपले अवतार कार्य संपविले. श्री गोपालदास महाराजांची समाधी पंचवटी येथे गोदावरी नदीच्या काठी आहे. श्री महाराज ज्या ओवरीत दीड वर्षे उभे होते व नंतर धुनी लावून होते ती ओवरी काळाराम मंदिरात प्रवेश करताच उजव्या हातास आहे. येथे श्री महाराजांचा फोटो ठेवला आहे.
ह्या लेखातील माहिती ही श्रे विवेक वैद्य, पुनर्वसू प्रकाशन व संपादक स्वामीकृपा दिवाळी अंक ह्यांच्या श्री गजानन महाराज चरित्रकोश व श्री माधवनाथ महाराज ह्यांच्या चरित्रातून घेतली आहे.
१९९०-९५ पर्यंत ह्या ठिकाणी श्री महाराजांच्या जिर्ण पादुका स्थानावर होत्या चैत्र पौर्णिमा १९९५ रोजी विश्वात्मक ॐ गुरूदेव जंगलीदास माऊली यांनी समाधीला साष्टांग दंडवत घातले व त्यांच्या भक्तांना म्हणाले "मानवी देह धारण करून प्रत्यक्ष भगवंतच नाना प्रकारच्या लिला करीत असतात. परंतु अवतार स्वरूपातील तो ईश्वर आपले खरे स्वरूप शुध्द अंतःकरणाच्या श्री नरसिंग महाराज रूपात आलेला परमेश्वरच येथे वास करीत आहे. ह्या स्थानाची मनोभावे सेवा करा येथे मोठे कार्य निर्माण होईल." आज जे भव्य समाधी मंदिर उभे आहे ते प. पू. परमहंस श्री नरसिंग गोपालदास महाराज भक्त मंडळीने सन २००४ मध्ये बांधले आहे.